इमानदारी
अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी धुमाळ नेहमी बोलतो,” ए बागवान, तू पीत पण नाही आणि खात पण नाही. मग पोलीस खात्यात कशाला आलास रे?”
वीस वर्ष इमानदारीने पोलीस खात्यात नोकरी केली. कधी एक पैसाही खाल्ला नाही. आता याचे तोटे असणारच ना. मागच्या महिन्यात माझ्या मुलीला, परीला मोठ्या कॉलेजात ऍडमिशन घ्यायची होती. पण नाही घेऊ शकलो. डोनेशनला द्यायला पैसे नव्हते ना माझ्याकडे. माझी बायको केतकी माझ्यावर भयंकर चिडली,” अहो सगळं जग बदललं. पण तुम्ही… कधीच बदलणार नाही.” रागाने परीला घेऊन तिच्या भावाकडे गेली, कायमची…पण माझ्या याच इमानदारीवर भाळून केतकीने माझ्याशी लग्न केले होते ना? आपल्या घरच्या सर्वांचा विरोध असतानाही… मला खात्री आहे केतकी आणि परी माझ्याकडे परत येतील.
तर आजचा दिवस माझ्या सहनशक्तीचा अंत पाहणार होता. एका गुंडाला पकडलं. पोरीची छेड काढत होता. तर मंत्र्याचा फोन आला,” सोड त्याला.” मी म्हटलं,”नाही सोडणार” पाच मिनिटात एसीपी धुमाळ चा फोन,”एऽऽ बागवान… लय मस्ती आली व्हय? तुझी ट्रॅफिकला बदली झालीय. जा उद्या तिकडं.” माझं डोकंच सणकलं. माझ्या इमानदारीचं हे बक्षीस?
सरळ गाडी काढली आणि घरी निघालो. संध्याकाळच ट्रॅफिक होतं. गाडी हळू चालली होती आणि मला तो दिसला… एका छोट्या लॉज मध्ये लपतछपत आत घुसत होता. पारेख… कानपूरला मालकाला टोपी लावून त्याचं दहा कोटीचा सोनं घेऊन फरार झाला होता. महिनाभर सगळे शोधत होते त्याला. मी सरळ लॉज मध्ये त्याच्या रूममध्ये घुसलो और दो झापड लगाये. तसा पारेख पोपटासारखा बोलू लागला. त्याची गचांडी धरली. लॉज मध्ये सीसीटीव्ही नव्हता. कोण बघत नाही हे बघत मी त्याला कार मध्ये घातला. त्याची बॅग पाठीमागे टाकली आणि निघालो.
काय डोक्यात आलं… मी गाडी पोलीस स्टेशनला न घेता सरळ वाईच्या जंगलात इथं या खोलीवर आणली. खोलीवर येताच पारेख जाम घाबरला,” साब मांडवली करो ना. हे दहा कोटीचं सोनं आहे. अर्ध तुम्ही ठेवा. तुम्हाला नोकरीत एवढं मिळणार नाही. साब विचार करा थोडा.”
मी विचार करू लागलो. या नोकरीने, या इमानदारीने मला काय दिलं? कष्ट मी करायचो, मेडल दुसराच कोणी घेऊन जायचा. माझी बायको मुलगी मला सोडून गेली आणि आज ट्रॅफिक मध्ये बदली. म्हणजे माझी उरलीसुरली इज्जत पण गेली. डोकं घणघणायला लागलं. संताप आला होता. मी झटक्यात पारेखच्या खुर्चीच्या मागे गेलो आणि त्याला समजायच्या आतच त्याची मान..,
पारेखची बॉडी जमिनीवर पडली. नाही, त्याची बॉडी नाही. माझी इमानदारीच तिथे मरून पडली होती…
चलो… इथून अर्ध्या तासावर दाट जंगलात एक दरी आहे. तिथे पारेखची बॉडी टाकतो. कोणालाच मिळणार नाही ती. उद्या ट्रॅफिकला जॉईन होतो… दहा दिवस काम करतो आणि मग राजीनामा…नंतर?
गुड बाय
लेखकः प्रमोद वाघमारे
Copyright ©️ Pramod Waghmare