दरवाजाकडं कवापासून बघतीय मी
आता दुपार झाली,
लय ऊन हाय बाह्यर
त्यो येनार हाय...
या अंगनात खेळायचा त्यो
लय हुशार माजा लेक
गावात पह्यला, तालुक्यात पह्यला
कवा इंजीन्यर जाला आनि कवा अमरिकाला गेला...
त्येच्या बापानं लय केलं त्याच्यासाटी
शेत इकलं त्याला शिकवाया
पर त्यानं परत इकत घेवून दिलं
त्याचं लगीन काय जोरात लावलं आमी...
चार वर्स झाली
बाप गेला तवा आला व्हता त्यो
दोन चार दिसानी फोन यायचा त्याचा
आता मह्यन्या मह्यन्याला येतू
दोन वरसं झाली नातू झाला
त्याचे फोटू पाटवतो मला...
दर मह्यन्याला पैसं पाटवतो,
लय माया हाय त्याची माज्यावर...
पर मला पैसं नगं...
मला त्याला भेटायचं, सुनंशी बोलायचं
नातवाला खेळवायचं हाय...
तो बोलला मी येतू म्हटला
शेजारची म्हातारी म्हन्ती त्यो नाय यायचा,
येडीच हाय ती...
मला म्हायती हाय त्यो येनार हाय...
बाह्यर गाडी थांबली कोन्तीतरी
माजा लेक आला वाटतं...
प्रमोद वाघमारे
#pramodplanet