अचानक छातीत असह्य कळा येऊ लागला. श्वास कोंडला. कशीबशी बाईक बाजूला घेता घेता कोसळलो.
काही लोक मला उचलत होते... हाॅस्पिटलमधे स्ट्रेचरवर नेत होते. वर सिलिंगच्या लाईट्स मागे जात होत्या. माझी बायको मुलांचे चेहरेसमोर येत होते...
ओटी मध्ये नेता नेता एक डाॅक्टर समोर आले. मला बघून मला ओळखून हसत माझा हात हातात घेत म्हणाले,” डोन्ट वरी.”
दोन महिन्यापूर्वी... ठिणगी पेटली. शहरात भडका उडाला. याच व्यक्तीला, त्याच्या घरच्यांना आणि त्याच्या शेजारच्या कुटुंबाला आम्हीकाही जणांनी मारहाण केली होती, त्याच्या घराची नासधूस केली होती.
ती दोन्ही कुटुंब त्याच रात्री त्यांची घरं सोडून गेली होती. त्याच व्यक्ती बरोबर मी ओटी मधे जात होतो. माझी शुद्ध हरपली...
थोडी थोडी जाग येऊ लागली. नर्सचा आवाज,” पेशंट जागा होतोय.”
बायको माझ्याकडे लगबगीने येत होती. चेहर्यावर काळजी आणि आनंदाचे मिश्र भाव...
त्याचवेळी तेच डाॅक्टर समोर आले,”डोन्ट वरी. दोन दिवसात घरी जाल तुम्ही.” बोलता बोलता माझा हात त्या मानवाने आपल्या हातातघेतला.
मी काही बोलू शकलो नाही. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते...
प्रमोद वाघमारे
आपले अभिप्राय नक्की लिहा
#pramodplanet