Thursday, October 3, 2019

ॲमेझाॅनचे वणवे : काही शिकवू पाहतंय

ॲमेझाॅनचे वणवे : काही शिकवू पाहतंय

ब्राझिलच्या अॅमेझाॅन जंगलांमधल्या वणव्यांनी आणि आगींनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. १९ आॅगस्ट २०१९ साओ पाओलो हे ब्राझीलचं सर्वात मोठे शहर भरदिवसा अंधाराने व्यापलं आहे. वणव्यांच्या काळ्या धुरामुळे भर दुपारी अंधार झाला. हजारोंच्या संख्येने वणवे पसरले, आगीने रौद्र भयावह रुप धारण केलं. अॅमेझॉन, रोडांनिया आणि साओ पाओलोमध्ये भरदिवसा अंधार झाला.

अॅमेझाॅन जंगल ५५ लाख चौरस किमी क्षेत्रात पसरलं आहे. जगात उपलब्ध ऑक्सिजनचा २० टक्के भाग ही जंगले निर्माण करतात आणि म्हणूनच या जंगलांना जगाची फुफ्फुसही म्हटलं जातं. १६ हजारांपेक्षा जास्त झाडं-झुडपांच्या प्रजाती, सुमारे ३९ हजार कोटी झाडं, २५ लाखांपेक्षा जास्त किटकांच्या विविध प्रजाती या जंगलांमध्ये सापडतात. अॅमेझॉनच्या जंगलात ४०० ते ५०० पेक्षा जास्त आदिवासी जाती राहतात.

या वणव्यांमुळे जीवहानी झालीच शिवाय अनेक प्रकारचे झाडे वनस्पती नष्ट झाल्या. पशु पक्षांना सुरक्षित हलवण्याची साधने आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रांची कमतरता पडली.

या वणव्यांच्या घटनेला आणखी एक पैलू नुकताच आढळून आला. माॅनीटरींग आॅफ द अॅंडियन ॲमॅझाॅन प्रोजेक्ट Monitoring of the Andean Amazon Project (MAAP) यांच्या रिपोर्टनुसार जवळपास १ लाख २५ हजार हेक्टर म्हणजे ३ लाख १० हजार एकर दाट जंगल २०१९ सालच्या सुरूवातीला तोडण्यात आले. या भागात आॅगस्ट महिन्यामध्ये आग लावण्यात आली आणि या जमिनी शेतीसाठी तयार करण्यात आल्या.

काही मोठे शेतकरी आणि मोठे कुरणे असलेले यांनी पद्धतशीरपणे पहिले जंगलतोड करून उन्हाळ्यात ही झाडे सुकल्यावर त्यांना आग लावली आणि या राखेचा खत म्हणून वापर केलेला आढळला. या मोकळ्या जमिनींवर गुरांना चरण्यासाठी कुरणे गायराने तयार करण्यात आल्याचेही लक्षात आले. नासा आणि इतर संस्थांच्या सॅटेलाईट फोटो आणि व्हिडीओ टाईम लॅप्स पद्धतीने अभ्यासल्यावर जंगलतोड आणि पाठोपाठ वणवे लावून जमिनी मोकळ्या केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले.

मानवी संवेदनहीनतेचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल. मानव कधी शेती, कधी घरांसाठी, कधी विकासासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी निसर्गावर आक्रमण करत आलाय. याचे दुष्परिणाम आता त्या त्या विभागांपर्यंत त्या त्या देशांपर्यंत मयार्दित राहिले नसून याला आता वैश्विक रूप येत आहे.

मानवाला या निसर्गाचा आदर करणे शिकले पाहिजे. ॲमेझाॅन वणवे आपल्याला काही शिकवू पहात आहेत !!!

प्रमोद वाघमारे
https://pramodplanet.blogspot.com/

 #PrayforAmazonas #pramodplanet

(C) Pramod Waghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...